Friday, June 19, 2009

ऑस्ट्रेलियातील हल्ले वर्णद्वेषातूनच की...?


blog from australia deepak darade

भारतीय विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबोर्न शहरात गेल्या पंधरवड्यात हल्ले झाल्याच्या बातम्या दररोज वाचायला आणि ऐकायला मिळताहेत. ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या पन्नास वर्षांत मोठ्या प्रमाणात भारतीय नागरीक स्थलांतरीत झाले आहेत. पण इतक्‍या वर्षांत त्यांच्यावर वर्णद्वेषातून हल्ला झाल्याची बातमी नव्हती. गेल्या पंधरा दिवसांतील बातम्यांमध्येही स्थायिक भारतीयांवर हल्ले झाल्याची बातमी नाही. मग फक्त विद्यार्थीच का लक्ष्य होत आहेत?...त्याची कारणे काय? खरी बाजू काय? हल्ले खरेच वर्णद्वेषातूनच झाले आहेत का?...हे समजून घेतल्याशिवाय त्याला वर्णद्वेषी म्हणणे घाईचे आणि चुकीचे ठरेल.
विद्यार्थ्यांच्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटना इथे नवीन नाहीत. भारतीय विद्यार्थ्यांबरोबरच इतरांबाबतही हे घडताना दिसते. पण, विद्यार्थी पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी इथे नोकरी करण्यासाठी पी. आर. (पर्मनंट रेडिडेन्सी) मिळवण्याच्या प्रयत्नात असतो. या देशातील आपली वागणूक चांगली ठेवण्याकडे त्याचे लक्ष असते. उगीच भानगड नको, म्हणून तो चोरी झाल्याची अथवा शिवीगाळ झाल्याची तक्रार करीत नाही.
चोरी किंवा त्याला झालेल्या मारहाणीबद्दल तो का तक्रार करीत नाही? असा प्रश्‍न साहजिकच पडतो. विद्यार्थी तक्रार करत नाहीत, याचे कारण इथले पोलीस आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या तक्रारी घेत नाहीत. त्याउलट "तुमची सुरक्षा तुम्ही करा', असे सांगतात. हे अनुभव फक्त भारतीय विद्यार्थ्यांचे नाहीत, तर बाहेरून शिकायला आलेल्या इतर देशांतील विद्यार्थ्यांनाही आले आहेत. गेल्या पंधरवड्यात हल्ले झाल्यानंतर मुले तक्रारी नोंदवायला गेली, तेव्हाही हाच अनुभव आला. आता हे प्रकरण फक्त चोरी होण्यापूरते अथवा शिवीगाळ करण्यापुरते मर्यादित राहिले नव्हते. अगदी जीव जाईल, असे हल्ले झाल्यामुळे आणि पोलीस कसलीही दखल घेत नसल्यामुळे आपला जीव धोक्‍यात आहे, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. परिणामी आजवर झालेल्या छोट्या-छोट्या घटनाही उजेडात येऊ लागल्या. पोलिसांनी वेळीच या उपद्रवावर उपचार केले असते, तर आज या घटना घडल्या नसत्या. पोलिसांनी याकडे गांभिर्याने पाहिले नाही. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता इथल्या पोलिस यंत्रणेला दोषी धरले जात आहे. त्यांच्यावर सर्वच थरातून टीका होताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया हा जगातील कमी गुन्हे घडणाऱ्या देशापैकी एक असल्याचे सांगितले जाते. इथे शहारांमध्ये पोलिसांची गस्त असते आणि शहरात असे प्रकार होताना दिसत नाहीत. पण शहरापासून दूर म्हणजे उपनगरात पोलिसांची संख्या आणि गस्त दोन्हीही कमी आहेत. उपनगरात राहणे स्वस्त पडत असल्याने बहुतांशी भारतीय विद्यार्थी या ठिकाणी राहतात. विद्यापीठातून अथवा कामावरून यायला एखाद्या रात्री उशीर होतो. रात्री रेल्वेमधून प्रवास करणारे फार कमी लोक असतात. एका डब्यामध्ये एखादीच व्यक्ती आहे, असेही अनेकदा घडते. उपनगरातील रेल्वे स्थानकांवरही रात्री कोणी नसते. उपनगरामध्ये राहणारे लोक रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास झोपी जातात. त्यामुळे रात्री आठनंतर रस्त्यावरही कोणी नसते. अशा परिस्थितीत प्रवास करणारे विद्यार्थी लक्ष्य होण्याची शक्‍यता अधिक रहाते. आजपर्यंत झालेल्या चोऱ्या रात्री प्रवास करताना अथवा एकटा कुठेतरी भटकताना झाल्या आहेत.
वर्णद्वषी कसे म्हणायचे?
इथे जवळपास ९० हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण हा ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे. वर्षांला दोन बिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतके पैसे एकट्या भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांना मिळतात. विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत भारतातील माध्यमांनी आवाज उठवला ही चांगली गोष्ट. पण, त्याला सरसकट वर्णद्वेषाचे लेबल लावणे चुकीचे आहे. कारण 90 हजार विद्यार्थ्यांमध्ये 2-3 जणांवर मोठा हल्ला झाला. इतर नोंद न झालेल्या हल्ल्यांची संख्या सहाशेच्या घरात असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी एखाद-दुसराच हल्ला वर्णद्वेषातून झाल्याचे आढळले. अन्य इतर घटना चोरीसारख्या आहेत. मात्र, इतर भारतीय विद्यार्थी आणि इथे स्थायिक झालेल्या भारतीय लोकांवर जर हल्ला होताना दिसत नसेल, तर त्याला वर्णद्वेषाचे स्वरूप कसे काय देणार? चोऱ्या केवळ भारतीय विद्यार्थ्यांच्या झालेल्या नाहीत, तर या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या चीन, युरोप, मलेशिया या देशातील विद्यार्थ्यांच्याही झालेल्या आहेत. फरक एवढाच की आपल्यापर्यंत त्या गोष्टी आलेल्या नाहीत.
आपलेही थोडे चुकतेय. इथे शिक्षणासाठी आलेला विद्यार्थी इथल्या संस्कृतीशी अनभिज्ञ असतो. शिवाय परिचित लोकांपासून दूर असतो. नियमांना फाट्यावर मारण्याची वृत्ती या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे अशीच मुले या घटनांचे बळी पडल्याचे दिसतात. मेलबर्नमध्ये झालेल्या हल्ल्यांपैकी एक हल्ला रात्री पबमध्ये झाला. पबमध्ये रात्री काय परिस्थिती असू शकते, याची कल्पना आपण करू शकतो. भारतीय मुलांची यात काहीच चूक नाही, असे आपण ठामपणे कसे सांगणार? गरज नसताना मोबाईलवर मोठ्याने बोलणे, मोठ्या आवाजात गाणी लावणे, रस्त्यावर थुंकणे, मुलींकडे वाईट नजरेने पाहणे या चुका ही मुले सर्रासपणे करतात. नुकताच सिडनीमध्ये पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता रॅली काढण्यात आली. त्यावेळी दोन ते तीन तास वाहतूक खोळंबली. हे योग्य आहे का?
हे प्रकार या लोकांना नवीन आहेत. अशावेळी वाद निर्माण होऊन त्याची परिणती भांडणात झाल्यास त्याला जबाबदार कोणाला धरायचे? तेव्हा आपणही कुठेतरी चुकतो आहोत, हे मान्य केलंच पाहिजे. सर्वच भारतीय मुले अशी वागतात असे नाही, मात्र कोणा एका-दोघांमुळे संपूर्ण समुदाय बदनाम होतो.
भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न या घटनांमुळे पुढे आला आहे. विविध देशात शिक्षण घेणारे विद्यार्थी त्या त्या देशात असलेल्या भारतीय संघटनांच्या संपर्कात नसतात. छोट्या- मोठ्या घटना घडल्यानंतर त्याची दखल न घेतल्यास भविष्यात त्याची मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचे सध्याच्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.